गुवाहटी (आसाम) - राज्यात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. आतापर्यंत पुरात 85 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यातील 2 हजार 325 गावांत पुरामुळे नुकसान झाले आहे. तर एकूण 24 लाख, 48 हजार, 128 जणांना याचा फटका बसला आहे.
आसाममध्ये पुराचा हाहाकार सुरू आहे. ब्रह्मपुत्रासह राज्यातील इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना या पूराचा फटका बसला आहे. राज्यातील बराक नदीतील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आसाम मध्ये सध्या सर्वत्र पुराच्या पाण्याचा वेढा दिसून येत आहे. आसाममधील नागरिकांना दरवर्षी अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करावा लागतो.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात होणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांआधी संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दिब्रुगड जिल्ह्यातील २५ हजार लोकांना फटका बसला. यामुळे दिब्रुगड जिल्ह्यात १४ निवारा केंद्रही स्थापन करण्यात आली होती. यावेळी पुराचे पाणी सेवानिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घरात घुसले होते. यानंतर त्यांच्या आजारी आईला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.