पाटना - उत्तर भारतामध्ये आज(गुरुवार) ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा जीव गेला आहे. तर उत्तरप्रदेश राज्यात 25 जण दगावले आहेत. बिहारमधील गोपालगंज या एकाच जिल्ह्यात 13 जण वज्रघाताचे शिकार झाले आहेत. देशावर कोरोना संकट असतानाच नैसर्गिक संकटानेही उत्तर भारतावर शोककळा पसरली आहे.
बिहारमधील मधुबनी आणि नवादा जिल्ह्यात प्रत्येक 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भागलपूर आणि सिवान जिल्ह्यात प्रत्येकी 6 जण दगावले आहेत. तर बंका, दरभंगा आणि चंपारण जिल्ह्यात प्रत्येक पाच जणांचा जीव गेला आहे. इतरही जिल्ह्यामध्ये जीवितहानी झाली आहे. तर वीज पडल्याने अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.
अनेकजण शेतात काम करत होते..
गोपालगंज जिल्ह्यामध्ये 13 जणांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याचे जिल्ह्याधिकारी अर्शद अझिझ यांनी सांगितले. यातील अनेक जण शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. राज्यातील सर्वच भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. उत्तरप्रदेशात 24 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 8 जण हे देओरिया जिल्ह्यातील आहेत. वज्रघाताच्या घटनांनी उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यावर शोककळा पसरली.