शाहजहांपूर - उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटना ताज्या असताना शाहजहांपूरमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर 15 वर्षांच्या मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली आणि मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अपर्णा गौतम यांनी सांगितले. तसेच अल्पवयीन आरोपीला बालगुन्हेगार न्यायालयात हजर केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पोलीस स्टेशन खुदागंज क्षेत्रातील आहे. गुरुवारी सायंकाळी एक 7 वर्षीय मुलगी घराबाहेर काही अंतरावर आपल्या मित्रांसह खेळत होती. तिथे आधीपासून उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने मुलीला शेतात खेचले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मुलगी किंचाळल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
उत्तर प्रदेश की अत्याचार प्रदेश?
यापूर्वी हाथरस येथे मुलीवर अत्याचार करून तिला मारण्यात आले होते. कुटुंबाच्या परवानगीशिवाय रात्रीच्या वेळी पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश की अत्याचार प्रदेश? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटना अद्याप घडतच आहेत.
हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊन काळात मुंबईत महिलांविरुद्धच्या हिंसाचार वाढला