जयपूर - राजस्थानमधील बासवाडा जिल्ह्यामध्ये एका सहा महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील कुशलगढ परिसरात कोरोना चाचणी घेण्यात आल्यानंतर एका सहा महिन्यांच्या मुलीसह एक ४७ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळून आली आहे.
या मुलीच्या वडिलांचीही कोरोना चाचणी ७ एप्रिलला पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, मुलीच्या आईची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कुटुंबियांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तर कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुबांतील इतर ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बासवाडा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत १ हजार ८०३ नागरिकांचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील १ हजार ६१८ रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ६६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकाच समुदायातील ६५ जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८१ नागरिकांचे अहवाल येण्याचे बाकी आहे.