नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्येही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तबलीगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या नोएडामधील 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती स्वत: पुढे येऊन न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नोएडाचे पोलीस उपायुक्त हरीश चंदर यांनी सांगितले. संबधित लोकांनी दिल्लीमधील कार्यक्रमाला हजेरी लावल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पोलिसांनी विलगीकरण कक्षात पाठवले होते. त्यांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकझ' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या अद्ययावत माहितीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 49 हजार 391 वर पोहचला आहे. तर यामध्ये 33 हजार 514 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, 14 हजार 182 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडा १ हजार 694 झाला आहे.