नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 3 हजार 390 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 103 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 342 झाला आहे, यात 37 हजार 916 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 16 हजार 539 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 1 हजार 886 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 17 हजार 974 कोरोनाबाधित असून 694 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 112 कोरोनाबाधित असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 5 हजार 980 कोरोनाबाधित तर 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 5 हजार 409 कोरोनाबाधित असून 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे.