नवी दिल्ली - काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या या 22 बंडखोर आमदारांनी आज पक्षाला रामराम ठोकत भाजपशी घरोबा केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत 22 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर १० मार्चला या सर्व आमदारांनी राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी यातील मंत्री असलल्या ६ जणांचे राजीनामे मंजूर केले होते. मात्र, १६ जणांचे मंजूर केले नव्हते. त्यांचेही राजीनामे २० मार्चला स्वीकारण्यात आले होते.
राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या आमदारांना भाजपने बंगळुरु येथील एका हॉटेलमध्ये थांबवले होते. बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह बंगळुरूमध्ये रामदा हॉटेलच्या समोर उपोषणाला बसले गेले होते. मात्र, त्यांना आमदारांना भेटू दिले नव्हते. अखेर आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने कमलनाथ यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तर काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले होते. भाजपला आमचा विकास पचला नाही, म्हणून त्यांनी आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. आमच सरकार यशस्वी बनेल, याची भाजपला भीती होती म्हणून ते माझ्या सरकार विरोधात षडयंत्र रचत राहिल्याचेही कमलनाथ म्हणाले.