काबूल - अफगाणिस्तानातील पाकटीका येथील एका मशिदीबाहेर ग्रेनेड हल्ला झाला. या स्फोटात २० नागरिक जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खैर कोट जिल्ह्यातील मोहम्मद हसन गावात रमजानच्या रात्रीची प्रार्थना चालू असताना ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांला दिली.
हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. तर, तालिबानींनी या घटनेत आपला हात नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यूएनएएमएने सरकारला नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत विशेष काळजी घेण्यास सुचवले आहे.