बंगळुरू - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामध्ये हातावर पोट असेलेल्या गरिबांची उपासमार होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोल्लार जिल्ह्यातील दोन भावडांनी आपली जमीन विकली असून त्या पैशातून ते गरिबांची मदत करत आहेत. जमीन विकून मिळालेल्या पैशामध्ये गरिबांसाठी किराणा माल आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची खरेदी केली असून त्याचे वाटप केले आहे. तब्बल 3 हजार कुटुंबाना या भावडांनी मदत केली आहे.
ताजाम्मुल पाशा आणि मुझाम्मील पाशा असे या दोन्ही भावडांचे नाव आहे. दोघेही व्यावसायिक आहेत. आपली जमीन त्यांनी 25 लाख रुपयांना विकली आहे. त्या पैशातून तेल आणि धान्यही खरेदी केले. घराशेजारी एक तंबू बसविला आणि मजूर आणि बेघर लोकांना अन्न देण्यासाठी स्वयंपाकघर सुरू केले.
पाशा बांधव हे केळीची शेती आणि रिअल इस्टेटमध्ये आहेत. आई-वडीलांचे निधन झाले तेव्हा ताजम्मुल हे 5 वर्षांचे तर मुझाम्मील हे 3 वर्षाचे होते. 'आमचे आई-वडील लवकर मरण पावले होते. त्यानंतर आम्ही कोलार येथे आमच्या आजीकडे राहण्यास आलो. तेव्हा हिंदू, शीख, मुस्लिम या समाजातील लोकांनी आम्हाला कोणत्याही धार्मिक पक्षपातीपणाशिवाय मदत केली, असे ताजम्मुल म्हणाले.
देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. एकीकडे अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आवाहन असताना कोरोनालाही देशातून समुळ नष्ट करण्याचे आवाहन सरकारपुढे आहे.