नवी दिल्ली - शहरात कोरोना विषाणूच्या चाचण्यांची संख्या तिप्पट वाढवण्यात आली आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या दिवसाला १८ हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिली. यापूर्वी शहरात एका दिवसाला सुमारे पाच हजार कोरोना चाचण्या होत होत्या, मात्र आता यामध्ये तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
सध्या दिल्लीमध्ये २५ हजार अॅक्टिव कोरोना रुग्ण असून, ३३ हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अॅक्टिव रुग्णांपैकी ६ हजार कोरोनाग्रस्त रुग्णालयांमध्ये दाखल आहेत, तर बाकी रुग्णांवर त्यांच्या घरी उपचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात दिल्लीत २४ हजार अॅक्टिव रुग्ण होते, तर या आठवड्यात २५ हजार अॅक्टिव रुग्ण आहेत. एका आठवड्यात केवळ १ हजार नव्या रुग्णांची नोंद दिल्लीमध्ये झाली आहे, म्हणजेच परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे असे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारच्या मदतीने सध्या अॅंटीजेन चाचणी घेण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. या चाचणीमुळे अवघ्या १५ ते ३० मिनिटांमध्येच अहवाल प्राप्त होतो.
यासोबतच, घरी उपचार सुरू असणाऱ्या सर्व रुग्णांना ऑक्सिजन मीटर पुरवण्याचा दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे. जेणेकरून त्या रुग्णांना आपला ऑक्सिजन रेट घरच्या घरीच तपासता येईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सोयही करण्यात आली आहे. जर घरी उपचार घेत असलेल्या कोणा रुग्णाला अचानक अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठ्याची गरज पडली, तर हेल्पलाईनवर फोन करून ते त्याबाबत माहिती देऊ शकतात, आणि काही वेळात घरच्या घरीच त्या रुग्णाला अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : रोहिणी ईएसआय रुग्णालयाची दूरवस्था, डॉक्टरांसह रुग्णांचे हाल