हैदराबाद : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोनावरील लसीला नुकतीच डीसीजीआयने परवानगी दिली आहे. या लसीच्या अत्यावश्यक आणि मर्यादित वापरासाठी डीसीजीआयची मान्यता मिळाली आहे. यानंतर आज भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी सांगितले, की कंपनी सध्या चार नवे उत्पादन कक्ष तयार करत आहे. या सर्व कक्षांमध्ये मिळून एका वर्षात तब्बल ७० कोटी लसींचे उत्पादन शक्य आहे.
कोव्हॅक्सिनचा डेटा इंटरनेटवर उपलब्ध..
कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नसल्याची टीका काही लोकांकडून केली जात आहे. याला प्रत्युत्तर देत कृष्णा म्हणाले, की या लसीच्या चाचण्यांचा पुरेसा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच, हा सर्व डेटा इंटरनेटवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या लसीच्या विविध टप्प्यांबाबत वेळोवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक नियतकालिकांकडून दखल घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हैदराबादमध्ये वीस कोटी लसींची क्षमता..
सध्या कंपनीच्या हैदराबादमधील शाखेत वीस कोटी लसींचे उत्पादन (वार्षिक) घेण्याची क्षमता आहे. तसेच, देशात इतर शहरांमध्येही आम्ही मॅनफ्रॅक्चरिंग युनिट उभारत आहोत, ज्यांची एकत्रित क्षमता ५० कोटी लसींचे उत्पादन घेण्याची असेल, असेही कृष्णा यांनी स्पष्ट केले. सध्या आमच्याकडे २० कोटी डोस तयार आहेत. २०२१च्या डिसेंबरपर्यंत आमच्याकडे ७६ कोटी डोस तयार असतील, असेही त्यांनी सांगितले.
कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा..
कोव्हॅक्सिनच्या चाचणीचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. २४ हजार स्वयंसेवकांवर याची चाचणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेली माहिती पाहता, एवढ्या मोठ्या स्तरावर, एवढे सखोल संशोधन करणारी आमची एकमेव कंपनी आहे, असे कृष्णा म्हणाले.
हेही वाचा : जगातील सर्वात मोठे कोरोना लसीकरण अभियान भारतात - पंतप्रधान मोदी