गुवाहाटी (आसाम) : आसाममधील कछार जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे रविवारी पहाटे एका मदरशाच्या वसतिगृहाच्या खोलीत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला.
विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला : ही घटना दरुस सलाम हाफिजिया मदरशाची आहे. हा विद्यार्थी रात्रीचे जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने सर्वत्र घबराट पसरली आहे. रबिजुल हुसेन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदरशाचे प्रशिक्षक मुलांना फजर नमाजाला (सकाळची प्रार्थना) बोलावण्यासाठी वसतिगृहाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना जमिनीवर शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिलचर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (एसएमसीएच) पाठवला आहे.
मदरसा सील केला : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमागचा हेतू अद्याप उघड झालेला नाही. तसेच या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी मदरशाचे तीन शिक्षक आणि २० विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मदरसा तूर्तास सील करण्यात आला आहे. या हत्येमुळे वसतिगृहातील मुले दहशतीत आहेत. अल्पवयीन मुलाची एवढ्या निर्दयीपणे हत्या कोणी केली आणि या हत्येमागील कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण आहे.
अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित : या घटनेमुळे समाजाला अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध असे भयंकर कृत्य कोण करू शकते, तसेच त्याला असा गुन्हा करण्यास कसे प्रवृत्त केले जाऊ शकते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तपास जसजसा पुढे जाईल, तसतशी या गंभीर गुन्हाची उकल होत जाईल.
हे ही वाचा :