अगरतला - त्रिपुराने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबूवर आधारित प्रकल्पांसाठी गौरवपूर्ण यश मिळवले आहे. बांबूच्या बाटल्या, बांबू तांदूळ आणि इतर बांबूच्या उत्पादनासाठी त्रिपुरा प्रसिद्ध आहे. आता त्रिपुराने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. बांबूच्या पानांपासून चहा विकसित करत त्रिपुराने चहा बाजारात प्रवेश केला आहे. तर 500 किलो बांबूच्या पानांच्या चहाची व्रिकीदेखील केली आहे. बांबूच्या पानांपासून चहा बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव समीर जमातिया असे आहे.
समीर जमातिया आपला पहिला ग्राहकही मिळवा आहे. त्याने जवळजवळ 500 किलो बांबूच्या पानांच्या चहाची विक्री दिल्लीतील एका व्यक्तीला केली आहे. तर तीन किलो चहा मदुराई येथील एका व्यक्तीने विकत घेतला आहे. मदुराईमधील व्यक्ती त्रिपुरात राहिला आणि संपूर्ण उत्पादन प्रक्रियेचा अभ्यास केला, असे समीर यांनी सांगितले.
समीर जमातिया हे बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. बांबूवर अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या देशांत मोठ्या प्रमाणात दौरे केले आणि बांबूशी संबंधित विविध कामांसाठी चीनमध्ये अनेक वर्षे घालविली. समीर यांनी बांबूच्या पानांच्या चहाचे उत्पादन स्वतःच केले आहे. अगदी पाने गोळा होण्यापासून ते चहा पॅकेजिंगपर्यंत सर्व कामे त्यांनी स्व:ता केली आहे. 120 प्रति किलो दराने त्यांनी चहा विकला आहे.
बांबू आरोग्यासाठी फायदेशीर -
बांबूच्या पानांचा चहा एंटीऑक्सिडेंट्स आणि अँटीबायोटिक गुणधर्मांसह समृद्ध आहे. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात सिलिकॉन असते. त्यमुळे केस, त्वचा आणि नखे निरोगी ठेवण्यास तसेच हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते, असे समीर यांनी सांगितले.
बांबूच्या 30 प्रजाती -
त्रिपुरामध्ये सुमारे 30 प्रजातीच्या बांबूची लागवड केली जाते आणि त्या सर्व प्रजातींमधून चहा तयार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे बांबुच्या चहामध्ये वेगवेगळे प्रयोग करत त्याची लज्जत आणखी वाढविली जाऊ शकते.