धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : धर्मशाला पोलिस स्टेशन आणि एसडीआरएफच्या टीमने सोमवारी धर्मशाळाजवळ ठठारना येथे अडकलेल्या ऑस्ट्रियन पॅराग्लायडरची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रियाच्या पॅराग्लायडर पायलट रोशमन गेराल्डने जगप्रसिद्ध पॅराग्लायडिंग साइट बीर बिलिंग येथून उड्डाण केले होते. त्यानंतर पॅराग्लायडिंग करत असताना तो धर्मशाळेच्या ठठारना येथे पोहोचला आणि तेथे एका झाडावर अडकला. त्याचे पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटले होते, त्यामुळे त्याला धर्मशाला येथील ठठारना येथे क्रॅश लँडिंग करावे लागले.
ऑस्ट्रियन पॅराग्लायडरची सुरक्षित सुटका : बैजनाथ जिल्ह्यातल्या कांगडा येथील बीर बिलिंग येथून उड्डाण केल्यानंतर हा पॅराग्लायडर ठठारनामध्ये अडकला होता. घटनेची माहिती मिळताच, एसएचओ सुरेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील धर्मशाला पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. एसडीआरएफलाही याबाबत माहिती देण्यात आली होती. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक, एसडीआरएफ आणि स्थानिक लोकांनी मिळून ऑस्ट्रियन पॅराग्लायडरची सुटका केली.
बचावानंतर पोलिसांचा आभार मानले : बचावानंतर ऑस्ट्रियन पॅराग्लायडर रोशमन गेराल्डने सुरक्षित बचावासाठी धर्मशाला पोलिसांचे आभार मानले आहेत. रोशमन गेराल्ड म्हणाला की, तो अत्यंत वाईत परिस्थितीत अडकला होता. पण पोलिसांच्या टीमने त्याला त्वरीत वाचवले. त्यामुळे आज तो वाचला. यासाठी तो सर्वांचा ऋणी आहे. तो म्हणाला की, भारतातील लोक खूप चांगले आणि नेहमी सहकार्य करणारे आहेत.
पॅराग्लायडर पायलटकडे वैध परवाना होता : या घटनेनंतर एएसपी हितेश लखनपाल यांनी पुष्टी केली की, ठठारनामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रियन पॅराग्लायडरची सुटका करण्यात आली असून तो सुरक्षित आहे. या ऑस्ट्रियन पॅराग्लायडरला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही, ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. ऑस्ट्रियातील रोशमन गेराल्ड पॅराग्लायडर पायलटकडे उड्डाण करण्याचा वैध परवाना होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या आधीही अनेक पायलट पॅराग्लायडिंग करताना अशा प्रकारच्या अपघाताचे बळी ठरले आहेत.
हे ही वाचा : Plane Collision Incident: हवेतच झाली असती एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्सच्या विमानांची टक्कर, थोडक्यात टळली