नवी दिल्ली - आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा सोमवारी राष्ट्रीय राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आसाम-मिझोराम सीमाप्रश्नावर चर्चा करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री, आसाममधील भाजपा खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही शेजारील राज्य मिझोरामशी असलेल्या सीमा वादावरून भेट घेण्याची शक्यता आहे.
शनिवारपासून नवी दिल्लीत असलेले सरमा काही कारणांमुळे शाह यांना भेटू शकले नाहीत. तथापि, शांतता राखण्यासाठी आंतरराज्य सीमेवरील विवादित भागात शांतता राखण्याच्या केंद्राच्या पुढाकाराला दोन्ही राज्यांनी संयुक्त निवेदनात सहमती दर्शविली.
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) चे प्रमुख आणि लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल सध्या राष्ट्रीय राजधानीत आहेत. आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. "मी आज अमित शहा यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात कोणतीही विशिष्ट वेळ देण्यात आलेली नाही. परंतु संध्याकाळी ते फोन करू शकतात. म्हणून मला सज्ज राहण्यास सांगितले गेले आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
केवळ मिझोरामच नाही, तर शेजारील काही राज्यांनीही आमच्या जमिनीचा भाग बळकावला आहे. एक विशिष्ट सीमा बनवली पाहिजे. मिझोरमने गेल्या 6-7 महिन्यांत आमच्या जमिनीचा काही भाग देखील घेतला आहे. त्यांनी तो सोडले पाहिजे, असेही ते म्हणाले.
याआधी ऑगस्टमध्ये मिझोरामचे राज्यपाल डॉ.हरी बाबू कळंभपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सद्य सीमा परिस्थिती आणि दोन राज्यांमधील तणाव कसा कमी करायचा यावर चर्चा केली होती. "ही एक दुर्दैवी घटना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह परिस्थिती कमी करण्याचा आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राज्यपालांनी एएनआयला सांगितले.
सीमा विवाद -
26 जुलै रोजी दोन्ही राज्यांमधील सीमा विवाद वाढला होता. दोन राज्यांच्या सैन्यादरम्यान झालेल्या गोळीबारात सहा आसाम पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक ठार झाला होता. या घटनेत किमान 50 लोक जखमी झाले आहेत.