काठमांडू - नेपाळ-भारत सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. या परिस्थितीत भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये सीमा विवाद सुरू झाल्यानंतरची ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे.
नेपाळ आणि भारत यांचे दीर्घकाळ विशेष संबंध राहिले आहेत. दोन्ही देशांदरम्यान चांगली मैत्री आहे आणि दोन्ही देशांमधील समस्या आणि गैरसमज संवादातून सोडवले जातील, असे पंतप्रधान ओली म्हणाले.
भारतीय लष्कराच्या विशेष विमानाने बुधवारी सकाळी 11.30 वाजता जनरल एमएम नरवणे हे काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यांचे स्वागत नेपाळी लष्कराचे लेफ्टनंट जनरल प्रभुराम शर्मा यांनी केले होते. नरवणे यांच्या नेपाळ दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून ते आज दिल्लीला परतणार आहेत.
नेपाळी लष्करातील 'मानद जनरल श्रेणी बहाल -
नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी एम. एम. नरवणे यांना नेपाळी लष्करातील मानद जनरल श्रेणी बहाल केली. ही परंपरा 1950मध्ये सुरू झाली होती. नरवणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वीणा नरवणेही आहेत.