टोरंटो - कॅनडाच्या खलिस्तानी अतिरेक्यांनी टोरंटोमधील एका प्रमुख हिंदू मंदिराची भारतविरोधी भित्तिचित्रे तयार करून विद्रुप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेला द्वेषपूर्ण गुन्हा ठरवत भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. टोरंटोच्या (BAPS) स्वामीनारायण मंदिरात ही घटना कधी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही.
द्वेषपूर्ण गुन्ह्यांना सामोरे जावे लागले - टोरंटोमधील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी ट्विट केले की, “आम्ही टोरंटोमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या भारतविरोधी भित्तिचित्रांसह केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. या घटनेची चौकशी करून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची विनंती कॅनडाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तर कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी टोरंटो येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची विटंबना केल्याच्या सर्व घटनांचा निषेध केला पाहिजे. ही केवळ एकच घटना नाही. कॅनडातील हिंदू मंदिरांना अलीकडच्या काळात अशा अनेक द्वेषपूर्ण गुन्ह्यांना सामोरे जावे लागले आहे. या घटनांबाबत कॅनडातील हिंदूंची चिंता रास्त आहे.
जबाबदार असलेल्यांची ओळख पटली - ब्रॅम्प्टन साऊथच्या खासदार सोनिया सिद्धू यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले की, “टोरंटोमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या विटंबनेच्या कृत्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. आम्ही एका बहुसांस्कृतिक आणि बहु-विश्वास समुदायात राहतो, जिथे प्रत्येकजण सुरक्षित वाटण्यास पात्र आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटली पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा होऊ शकेल.