जयपूर- राजस्थानमध्ये दिवाळीत अन्नकूट उत्सव साजरा केला जातो. या निमित्त देवाचा प्रसाद लुटण्याची अनोखी परंपरा राजसमंदमधील श्रीनाथजी मंदिरात पाहायला मिळते. या मंदिरात ठाकूरजीसमोर अन्नकूटचा प्रसाद हा आदिवासींकडून लुटला जातो. त्यासाठी आदिवासी बांधव हे टोळी करून प्रसाद लुटण्यासाठी येतात. सोमवारी पुष्टिमार्गीय वल्लभ संप्रदायाच्या या श्रीनाथजी मंदिरात अन्नकोट महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
अन्नकूट उत्सवात प्रभू श्रीनाथजी, विठ्ठलनाथजी आणि लालन यांना ५६ प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यात आले. यावेळी आदिवासी समुदायाकडून देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याची लूट करण्यात आली. प्रसाद लुटण्याची परंपरा रात्री अकरा वाजता पार पडली. नाथनगरच्या परिसरातील लोकांनी नैवेद्यासह प्रसादाचे तांदूळ लुटले. मंदिरातून लुटण्यात आलेला प्रसाद हा आदिवासी बांधव त्यांच्या नातेवाईकांमध्ये वाटतात. तर तांदूळ हा औषध म्हणून घरी ठेवण्यात येतो. मंदिरात लुटून आणलेला प्रसाद घरी ठेवल्यानंतर कोणतेही संकट येत नाही, अशी आदिवासींची श्रद्धा आहे. तसंच प्रसादाचं सेवन केल्यानंतर घरात कोणीही आजारी पडत नाही. घरात सुख येते, अशीदेखील आदिवासींची श्रद्धा आहे.
अन्नकूट लूटण्याची परंपरा - मंदिरातील पुजारी विशाल बावा यांनी सांगितले की, जोपर्यंत चारही वर्णाच्या लोकांना प्रसाद मिळत नाही, तोपर्यंत श्रीजी अन्नकूट महोत्सव पूर्ण पार पडत नाही. अनेक वर्षांपासून आदिवासी समुदाय मंदिरातून प्रसाद घेऊन जातो. प्रत्येकाची ईश्वराबद्दलची श्रद्धा आहे. सोमवारी रात्री ११ वाजता अन्नकूट लुटण्याची परंपरा पार पडली. यामध्ये परिसरातील लोकांनी आणि आदिवासी समाजातील स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. त्यापूर्वी दोन तास पूर्वी म्हणजे रात्री ९ वाजता मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. अन्नकूट लूटण्याची परंपरा पाहण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. यामध्ये परराज्यातील भाविकांचाही समावेश होता.
काय आहे मंदिराची आख्यायिका- श्रीनाथजी मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती ही स्वयंभू मानली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान कृष्णाची मूर्ती ही गोवर्धन पर्वतामधून प्रकट झाली आहे. श्रीनाथजीची सर्वप्रथम पूजा ही मथुरा जवळील गोवर्धन पर्वतावर करण्यात आली होती. मोगलांच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळ श्रीनाथजीची मूर्ती काही काळ लपवून ठेवण्यात आली होती.