प्रयागराज - फूलपूर येथील इफको (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड) संयंत्रात अमोनिया वायूगळतीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी 15 जणांची प्रकृती बिघडली आहे, अशी माहिती प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी बुधवारी दिली.
'प्लांट युनिट बंद केले आहे आणि आता वायूगळती थांबली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे,' असे गोस्वामी यांनी सांगितले.
माहिती देताना इफ्कोचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित श्रीवास्तव यांनी सहायक व्यवस्थापक बीपी सिंह आणि उपव्यवस्थापक अभिनंदन अशी दोन मृतांची ओळख पटवली असल्याचे सांगितले. 'वायूगळतीच्या दुर्घटनेनंतर दोन अधिकाऱ्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते दोघे जण सहायक व्यवस्थापक (युरिया) आणि उपव्यवस्थापक (ऑफसाइट) होते,' अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, पीडितांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - पश्चिम बंगाल : ममता सरकारमधील चार मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीला दांडी, राजीनाम्याची रंगली चर्चा
जॉनपूर-गोरखपूर रोडवरील फुलपूर येथे इफकोची अमोनिया आणि यूरिया मॅन्युफॅक्चर रिंगची ही दोन युनिट आहेत. मंगळवारी रात्री युरिया युनिटमध्ये जेव्हा अमोनिया वायूगळती झाली तेव्हा हे काम सामान्यपणे सुरू होते. गळतीनंतर बहुतेक कामगार पळून गेले, त्यातील 14 जण बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दोघांचा मृत्यू झाला.
ट्रान्स गंगा एसपी धवल जयस्वाल यांनी सांगितले की कंपनीचे वरिष्ठ अधिकारी युनिटमध्ये पोहोचले आणि त्यांनी वायूगळती बंद केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि मदतकार्य त्वरित पार पाडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढे त्यांनी घटनेचे कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.
इफको ही युरिया बनविणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. वायूगळतीच्या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा - 'कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडून स्वागत'