लखनौ - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळलेल्या खोलीची पोलिसांनी मंगळवारी तपासणी केली आहे. त्यानंतर ही खोली सील करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. अखिलेश म्हमाले, की महंत नरेंद्र गिरी यांच्याशी संबंधित सर्वच लोकांना सत्य समोर यावे, अशी इच्छा आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी. त्यामुळे संपूर्ण सत्य जनेतेसमोर येऊ शकेल. महंत नरेंद्र गिरी हे जमिनींवर बुलडोझर चालविणार होते, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून महंत नरेंद्र गिरी हे मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. महंत हे त्रस्त झाले होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी.
संबंधित बातमी वाचा-महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण; सुसाईड नोट हाती लागली, त्यात लिहिलंय...
सीबीआय चौकशीची मागणी-
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांच्य मृत्यू प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील सुनील चौधरी यांनी दाखल केली आहे. नरेंद्र गिरी कधीही आत्महत्या करणार नाहीत, असे विविध संतांचे म्हणणे आहे. महंत यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही जणांचा वारस म्हणून उल्लेख केला आहे. चिठ्ठीत नाव लिहिलेले आनंद गिरी, हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे माजी खासदार विनय कटियार यांनी महंत नरेंद्र यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष चौकशी करणे हा एकमेव मार्ग असल्याचे माजी खासदार कटियार यांनी म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा-अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका
महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज जिल्ह्यात संशयास्पद स्थितीत सोमवारी मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मठामधील लोकांची चौकशी सुरू आहे. प्रयागराजमधील बाघंबरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार महंतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. महंत यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. महंतांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस मठामधील लोकांची चौकशी करत आहेत.
संबंधित बातमी वाचा-महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ