चंदीगड - विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने पंजाबमधील राजकीय वातावरण तापत आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने युती केली आहे. आज यासंदर्भात जाहीर घोषणा झाली. चंदीगडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आणि बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीश अभगा मिश्रा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. आता दोन्ही पक्ष एकाच अजेंड्यावर रिंगणात उतरले आहेत.
राज्यात एकूण 117 विधानसभा जागांपैकी बसपा 20 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, तर उर्वरित 97 जागांवर अकाली दलाचे उमेदवार लढतील. ही आघाडी राज्यात लोकांच्या बहुप्रतिक्षित विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करेल, असे युतीनंतर बसपा पक्षाच्या सुप्रीमो मायावती म्हणाल्या. त्यांनी टि्वट करून सुखबीरसिंग बादल यांना शुभेच्छा दिल्या.
मायावतींचे टि्वट -
शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने पंजाबमध्ये युती केली आहे. ही युती एक नवीन राजकीय आणि सामाजिक उपक्रम आहे. यातून बहुप्रतिक्षित विकास, प्रगती आणि लोकांच्या समृद्धीच्या नव्या युगाला सुरुवात होईल. या ऐतिहासिक सुरवातीसाठी शिरोमणी अकाली दलाला मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा, असे टि्वट मायावती यांनी केले.
अकाली दलाची भाजपाशी फारकत -
यापूर्वी अकाली दलाची भाजपशी युती होती. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेरची वाट धरली. अकाली दलासोबत युती करून भाजपा राज्यात 23 जागांवर लढत होती.
अकाली दल आणि बसपा 25 वर्षानंतर एकत्र -
याआधीही बसपा आणि अकाली दल या दोन्ही पक्षांमध्ये युती झालेली आहे. 1996 च्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंजाबमधून निवडणुका जिंकल्यानंतर तत्कालीन बसपा सुप्रीमो कांशीराम लोकसभेत गेले होते. यंदा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाशसिंग बादल आणि त्यांचा मुलगा सुखबीरसिंग बादल यांनी मायावतींशी हातमिळवणी करून राज्यातील मागासवर्गीय आणि दलित मतांवर कब्जा करण्याची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये दलितांची 32 टक्क्यांहून अधिक व्होट बँक आहे.
आजवर पंजाबमध्ये एकही दलित मुख्यमंत्री नाही -
देशात पंजाबमध्ये सर्वाधिक दलित लोकसंख्या आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 32 टक्के लोक दलित आहेत. परंतु आजपर्यंत कोणताही दलित पंजाबच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री झाला नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दलितांमध्ये समन्वयाचा अभाव हे मुख्य कारण आहे. येथील दलित विभागले गेले आहेत. काहींची निष्ठा अकाली दलाकडे तर काहींचा कल काँग्रेसकडे आहे. पंजाबमध्ये हे कधीही एकत्र आले नाहीत.