नवी दिल्ली : भारत यंदा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. भारताला सध्या या बैठकीचे अध्यक्षपद आहे. बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्घाटनाचे भाषण करणार आहेत. एससीओच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत चीन आणि पाकिस्तान देखील सहभागी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही देशाचे प्रतिनिधी या बैठकीत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार आहेत.
रशियाचा देखील सहभाग : रशियन सुरक्षा परिषदेच्या माहितीनुसार, रशियन फेडरेशनच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव्ह हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. यानंतर एससीओची पुढील महत्वाची बैठक 27 ते 29 एप्रिल दरम्यान संरक्षण मंत्र्यांमध्ये होणार आहे. ही बैठकही दिल्लीतच होणार आहे. संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर 4 आणि 5 मे रोजी गोव्यात परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत एससीओ सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत.
भारत 2017 पासून पूर्ण सदस्य : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची स्थापना 2001 मध्ये झाली आहे. या संघटनेत भारत, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या आठ राष्ट्रांचा समावेश आहे. भारत 9 जून 2017 रोजी एससीओचा पूर्ण सदस्य झाला. यामध्ये अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया या चार निरीक्षक देशांचा देखील समावेश आहे. तसेच आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्की हे सहा देश संवाद भागीदार म्हणून समाविष्ट आहेत.
एससीओचा जागतिक पातळीवर प्रभाव : एससीओ ही जागतिक पातळीवर एक प्रभावी संघटना म्हणून गणली जाते. ही संघटना सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक, राजकीय आणि लष्करी सहकार्याला चालना देण्यासाठी दोन दशकांपासून कार्यरत आहे. एससीओचे आठ सदस्य देश जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 42 टक्के आणि जागतिक जीडीपीच्या 25 टक्के आहेत.