पुणे : केंद्र सरकारने लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर, आज सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचे डोस बाहेर पडले. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असून, गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या अथक मेहनतीचे हे फळ असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
पाहूयात त्यांच्या विशेष मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे...
प्रश्न : या लसीची सध्याची किंमत काय आहे, आणि जेव्हा खासगी बाजारात याचे वितरण होईल, तेव्हा तिची काय किंमत असेल?
अदर : सध्या आम्ही सरकारला ही लस २०० रुपये प्रति डोस या दराने देत आहोत. सुरुवातीचे काही कोटी डोस आम्ही याच दराने सरकारला देऊ. ही लस सरकारकडून अत्यावश्यक कर्मचारी, वयोवृद्द आणि गंभीर आजार असणाऱ्या लोकांना मोफत मिळणार आहे. अद्याप ही लस खासगी बाजारपेठेमध्ये उपलब्ध करण्यात आली नाही. काही महिन्यांनंतर जेव्हा याची परवानगी मिळेल, तेव्हा एक हजार रुपये प्रति डोस या दराने ही लस उपलब्ध होईल.
प्रश्न : सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सरकारला किती डोस देणार आहात? इतर देशांनाही तुम्ही लस पुरवणार आहात का?
अदर : सध्या आम्ही ११ दशलक्ष डोस सरकारला दिले आहेत. तसेच आणखी काही कोटी डोस आम्ही सरकारला देणार आहोत. यासोबतच, आम्ही आफ्रिका, सौदी अरेबिया, बांगलादेश, ब्राझील अशा देशांसोबतही करार केला आहे. सध्या जगातील कित्येक देशांचे लक्ष भारतावर लागून आहे. कारण जगातील कित्येक कंपन्यांची उत्पादन क्षमता ही भारतातील कंपन्यांपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे या सर्व देशांना लसीसाठी भारताकडूनच आशा आहेत.
प्रश्न : या लसीच्या दुष्परिणामाबाबत बरंच काही बोललं जात आहे; तुम्ही काय सांगाल?
अदर : थोड्याफार प्रमाणात दुष्परिणाम तर सर्वच लसींचे जाणवतात. मात्र हे अगदीच काही लोकांना, आणि तेही कमी प्रमाणात दिसून येतील. देशाच्या सरकारने सर्व चाचण्या करुनच लसीला परवागनी दिली आहे, त्यामुळे याबाबत कोणतीही शंका ठेवण्याचे कारण नाही. लोकांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लस घेणे आवश्यक आहे.
प्रश्न : सध्या जागतिक महामारी पाहता तुम्ही लसीचे उत्पादन आणि वितरण कसे करणार आहात?
अदर : सध्या महिन्याला ८० ते ९० दशलक्ष डोसेस बनवण्याची आमची क्षमता आहे. देशभरात ड्राय रन्सही पार पडल्या आहेत. आम्ही लसीच्या वितरणासाठी खासगी कंपन्यांशीही करार केला आहे. तसेच, सरकारनेही या लसीच्या वितरणाचे अगदी योजनाबद्ध नियोजन केले आहे.
हेही वाचा : गरज भासल्यास नाईक यांच्यावर दिल्लीत होतील उपचार - संरक्षण मंत्री