चेन्नई : तामिळनाडूतील एग्मोर कोर्टाने अभिनेत्री आणि माजी राज्यसभा खासदार जयाप्रदा यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालय जयाप्रदा यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयाप्रदा यांच्या थिएटर कामगारांनी त्यांच्यावर राज्य विमा महामंडळाला ईएसआय न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर जयाप्रदा यांना ६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
काय आहे प्रकरण : जयाप्रदा चेन्नईच्या राम कुमार आणि राज बाबू यांच्यासोबत अण्णा सलाई येथे एक थिएटर चालवायच्या. मिळालेल्या माहितीनुसार, हे थिएटर आता अस्तित्वात नाही. १० वर्षांहून अधिक काळ झाले ते बंद आहे. मात्र या थिएटरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांकडून गोळा केलेला ईएसआय कर्मचारी राज्य विमा महामंडळाला (ईएसआयसी) दिला गेला नाही.
सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड : या संदर्भात ESIC ने चेन्नईच्या एग्मोर कोर्टात केस दाखल केली होती. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात जयाप्रदा आणि इतरांनी दाखल केलेल्या तीन याचिका फेटाळण्यात आल्या. जेव्हा हे प्रकरण एग्मोर कोर्टाच्या न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले तेव्हा जयाप्रदा यांनी सांगितले की, त्या मजुरांकडून मिळालेली रक्कम देतील. मात्र ईएसआयसीच्या वकिलाने यावर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जयाप्रदा यांच्यासह तिघांना सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत : जयाप्रदा 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. कमल हसन स्टारर 'सलंगाई ओली' हा जयाप्रदा यांचा लोकप्रिय चित्रपट आहे. त्यांनी कॉलीवूड, टॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री केली. त्यांनी 1994 मध्ये तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) मध्ये प्रवेश केला. 2004 ते 2014 या काळात त्या उत्तर प्रदेशातील रामपूरमधून समाजवादी पक्षांच्या खासदार होत्या.
हेही वाचा :