कराड (सातारा) - कराड दक्षिणमधून १९९५ साली शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवलेल्या अशोक भावके (वय ५२) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू ( Accidental death of Shiv Sena leader Ashok Bhavke ) झाला. कराड-रत्नागिरी महामार्गावर मंगळवारी (दि. १५) रात्री ११ वाजता ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र हा घातपात की अपघात या चर्चेला परिसरात उधाण आले आहे.
अज्ञात वाहनाने दिली जोरदार धडक -
कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेसमोर अशोक भावके यांचे मातोश्री हॉटेल आहे. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलसमोरील महामार्गावर उभे होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कार सीसीटीव्हीत कैद -
अपघातानंतर कराड ग्रामीण पोलिसांनी घोगावपासून सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासली. घोगावमधील एका सीसीटीव्हीत एक कार कराडकडे गेल्याचे दिसून आले. मात्र, फुटेजमध्ये नंबर दिसत नव्हता. पुणे-बंगळुरू महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर सीसीटीव्हीमध्ये होंडा कंपनीच्या कारचे फुटेज पोलिसांना मिळाले. ती कार मुंबईची असल्याचे समजते.
पोलिसांकडून सखोल तपास -
अशोक भावके हे मागील पाच-सहा वर्षांपासून मुंबईत स्थायिक होते. तेथे त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला होता. मुंबईत त्यांनी अपार्टमेंट बांधले आहे. या सर्व बाबी पाहता सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी अशोक भावके यांच्या अपघाती मृत्यूचा तपास सुरू केला आहे.
१९९५ ला शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती निवडणूक -
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून १९९५ साली आशोक भावके यांनी शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. कराड दक्षिण या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात त्यांनी लढत दिली होती. त्यानंतर त्यांनी कराड दक्षिणमध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण केला होता.
मनोहर जोशींचे होते निकटवर्तीय -
१९९५ ला युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी अशोक भावके यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. जोशी यांच्या सहकार्याने घोगाव (ता. कराड) येथे श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर मातोश्री सहकारी पतसंस्था स्थापन केली. अशोक भावके हे अल्पावधीत मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय बनले होते.
हेही वाचा - Big Incident in UP : यूपीत मोठी दुर्घटना; हळदीच्या कार्यक्रमात विहिरीत पडून 11 महिलांचा मृत्यू, अनेक गंभीर