गाझियाबाद Abhijita Gupta : तुम्ही कल्पना करू शकता का, की ज्या वयात मुलं आई-वडिलांकडे खेळण्यांचा आग्रह धरतात, त्या वयात एका मुलीनं पुस्तक लिहायला सुरुवात केली! होय हे खरं आहे. इयत्ता पाचवीत शिकणारी गाझियाबादची एक मुलगी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून पुस्तकं लिहिते. आता तिचं वय दहा वर्ष असून तिनं आत्तापर्यंत तब्बल ३ पुस्तकं लिहिली आहेत! ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून, राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांची पणती आहे. अभिजीता गुप्ता असं तिचं नाव.
१० व्या वर्षी स्वत:ला लेखिक म्हणून स्थापित केलं : कवी मैथिली शरण गुप्त यांचं नाव ऐकलं की सर्वात प्रथम आठवतात त्यांच्या अर्थपूर्ण, जोमदार आणि देशभक्तीपर कविता. तसेच त्यांची 'भारत भारती' ही रचना आठवते, जी स्वातंत्र्यलढ्यात खूप प्रभावी ठरली होती. वयाच्या ५९ वर्षापर्यंत त्यांनी हिंदीमध्ये सुमारे ७४ रचनांचं योगदान दिलं. यात दोन महाकाव्यं, १७ गीतकाव्य, २० कवितांचे खंड, चार नाटकं आणि गीतनाट्य यांचा समावेश आहे. त्यांची पणती अभिजीता हिने देखील तोच मार्ग अवलंबलाय. तिनं वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी स्वत:ला लेखिक म्हणून स्थापित केलं. फरक एवढाच आहे की, मैथिली शरण गुप्त हे हिंदी कवी होते, तर अभिजीतानं तिची पुस्तकं इंग्रजीत लिहिली आहेत.
अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केली आहेत : इंदिरापुरम, गाझियाबाद येथील रहिवासी अभिजीतानं 'हॅपिनेस ऑल अराऊंड', 'टू स्टार्ट विथ द लिटल थिंग्ज' आणि 'वी विल श्युअरली सस्टेन' ही तीन पुस्तकं लिहिली आहेत. आतापर्यंत तिनं 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' (लंडन) मध्ये आपलं नाव नोंदवलंय. तिला आतापर्यंत डझनाहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. तिनं नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली होती.
जगात नाव कमवायचं आहे : 'कुछ काम करो, कुछ काम करो. जग में रहकर निज नाम करो, यह जन्म हुआ किस अर्थ हो, समझो जिसमें यह व्यर्थ न हो'. मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतील या ओळींप्रमाणे, त्यांच्या पणतीलाही जगात नाव कमवायचं आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी तिच्याशी खास संवाद साधला. वाचा या संभाषणातील काही अंश.
प्रश्न : तुला लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळते?
उत्तर : मी माझ्या आजूबाजूच्या वातावरणातून प्रेरणा घेते. मी चांगली निरीक्षक आहे. याशिवाय मी माझ्या भावना आणि विचार शब्दांत मांडते. मी अनेक प्रकारची पुस्तकं वाचली आहेत. ज्यामुळे माझ्या कल्पनेची व्याप्ती वाढली आहे.
प्रश्न : पुस्तक लिहिण्यासाठी विषय कुठून आणायचा? कारण विषयाची निवड खूप महत्त्वाची असते.
उत्तर : मी फक्त तेच विषय निवडते जे हजारो लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतील. तसेच ज्यात वाचक आणि लेखक यांचा संबंध असेल, जेणेकरून हजारो लोकांना प्रेरणा मिळू शकेल. तरच तुम्ही लेखक म्हणून यशस्वी होऊ शकता.
प्रश्न : तुझे आजोबा हिंदी कवी होते, मग तु इंग्रजी माध्यम का निवडलं?
उत्तर : आजकाल आपली पाठ्यपुस्तकं इंग्रजीत आहेत. जवळजवळ प्रत्येकजण इंग्रजी बोलतो. आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. त्यामुळे जेव्हा माझे विचार शब्दांत मांडण्याची वेळ येते तेव्हा मला हिंदीपेक्षा इंग्रजी थोडं सोपं वाटतं. पण मी हिंदीतही लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रश्न : तुला तुझ्या कुटुंबाकडून कशाप्रकारे पाठिंबा मिळतो?
उत्तर : जेव्हा जेव्हा समस्या येतात तेव्हा माझं कुटुंब मला प्रोत्साहन देतं. माझ्या कथा, कविता ऐकताना ते माझी स्तुती करतात. कधी रात्री किंवा सकाळी लिहावं लागतं. अशा परिस्थितीत मला माझ्या आई-वडिलांच्या आधाराची गरज आहे. त्यासाठी ते मला कधीच नाही म्हणत नाहीत. कल्पना काही वेळ पाहून येत नाहीत हे माझ्या घरच्यांना चांगलं कळतं.
प्रश्न : लेखक होण्यासाठी अख्ख आयुष्य कमी पडतं. तुला इतक्या लहान वयात हे यश कसं मिळालं?
उत्तर : तुमच्या आवडीचा पाठपुरावा करून तुम्ही यशाकडं जाता. मी स्वतःला लेखक मानत नाही. मी फक्त माझ्या मनाचं ऐकते. पण माझ्यासमोर अनेक गोष्टी आहेत आणि मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे.
प्रश्न : लेखन आणि अभ्यास यांचा ताळमेळ कशी साधते?
उत्तर : जेव्हा अभ्यास आणि लेखन यांच्यात समन्वयाचा प्रश्न येतो तेव्हा मी आधी माझा गृहपाठ पूर्ण करते. कारण जीवनात शिक्षणाचं महत्त्व मला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत माझा गृहपाठ पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टीत माझं १०० टक्के देऊ शकत नाही.
हेही वाचा :