गांधीनगर : गुजरातच्या भरुचमध्ये असलेल्या कंबोडिया गावात गोठ्याला लागलेल्या आगीत १८ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी ही दुःखद घटना घडली. मृतांमध्ये ९ गायी, ८ वासरे आणि एका घोडीचा समावेश आहे.
अचानक लागली आग..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंबोडिया गावात राहणाऱ्या राम रापोलिया यांनी दोन वर्षांपूर्वी हा गोठा उभारला होता. ते आपल्या कुटुंबीयांप्रमाणे या जनावरांची देखभाल करत. जनावरांना उन्हाळ्यात त्रास होऊ नये यासाठी त्यांनी बांबू आणि ग्रीन नेटचा वापर करत हा गोठा बांधला होता. या गोठ्यात एकूण २८ जनावरे होती. रविवारी दुपारी राम आपल्या घरी जेवण करत असतानाच त्यांना गोठ्यात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत संपूर्ण गोठ्याने पेट घेतला होता.
१८ जनावरे दगावली; लाखोंचे नुकसान..
रापोलिया कुटुंबीयांनी जनावरांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र ते केवळ दहाच जनावरांना वाचवू शकले. इतर १८ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. यात राम यांचे सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.
जखमी जनावरांची स्थिती गंभीर..
घटनेनंतर राज्याच्या पशुपालन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. यामध्ये जखमी झालेल्या जनावरांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र त्यांपैकी कित्येकांची स्थिती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या गोठ्याला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या पोलीस आणि पशुपालन विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : नवीन कोरोना स्ट्रेनचा भारतात आतापर्यंत 90 जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट