श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केलेल्या घटनेमध्ये तीन पोलीस ठार झाले होते. या घटनेच्या दुसर्याच दिवशी पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारने पाकिस्तानशी चर्चा सुरू करावी, असे म्हटलं. केंद्रशासित प्रदेशात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी सरकारने स्थानिकांना विश्वासात घ्यावं, असेही त्या म्हणाल्या.
काश्मीर हा एक मोठा मुद्दा आहे. हा प्रश्न निकाली काढला पाहिजे. जेणेकरून रक्तपात थांबेल. येथील लोक शांततेत जगू शकतील, असे त्या म्हणाल्या. किमान केंद्रशासित प्रदेशातील हिंसाचार रोखण्यासाठी चर्चा सुरू केली पाहिजे. भाजपा सरकारने विचार करण्याची आणि चर्चेची प्रक्रिया सुरू करायला हवी, असे त्या म्हणाल्या.
दहशतवाद्याचा बेछूट गोळीबार -
जम्मु-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये शुक्रवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस ठार झाल्याची घटना समोर आली होती. बघाट चौकात तैनात असलेल्या पोलिसांवर संशयित दहशतवाद्याने गोळीबार केला. या घटनेत चौकात उभे असलेले दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भारत-पाकिस्तान चर्चा -
दहशतवाद आणि संवाद एकत्र शक्यच नाहीये. आजपर्यंत भारताने पाकिस्तानसोबत संवाद साधत प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आता पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी देणे थांबवले पाहिजे अशी आग्रही भूमिका भारताने घेतली आहे. भारताविरोधात कारवाई करणाऱ्या विविध दहशतवादी गटांवर, संघटनांवर पाकिस्तानने कारवाई करावी अशी मागणी भारताने केली आहे. पठाणकोठ आणि पूलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध खराब झाले आहेत.