नवी दिल्ली- पौराणिक कथानुसार रावणाने तिन्ही लोकांवर विजय मिळवित देवांनाही बंदिस्त केले होते. रावणाला धन, ज्ञान आणि शक्तीचा गर्व होता. तरीही त्याचा रामाकडून पराभव झाला. दरवर्षी दसऱ्यानिमित्त रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. जाणून घ्या, रावणाच्या जीवनातून आपल्याला काय संदेश मिळतो?
रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन हा वाईट शक्तीवर चांगल्या शक्तींनी विजय मिळविल्याचे प्रतिक मानले जाते.
- आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विश्वास संपादन करा - रावणाचा भाऊ बिभीषणनेही त्याला साथ दिली नाही. त्यामुळे रावणाच्या कमकुवत स्थानांची माहिती श्रीरामाला कळू शकली. त्यामुळे अमर असलेल्या रावणाचा मृत्यू झाला.
- नेहमीच विजय होईल, या भ्रमात राहू नका -रावण अजिंक्य असल्याने श्रीरामाविरोधातील लढाईत गाफील राहिला. वानरसेनेने समुद्र ओलांडून रावणाच्या लंकेवर हल्ला केला. त्यानंतरच्या लढाईत रावणाला पराभव पत्करावा लागला.
- आपले सहकारी, मित्र यांच्या सल्ल्यावर जरूर विचार करावा - रामाबरोबर शत्रुत्व केल्यास विनाश अटळ असल्याचा दरबारातील मंत्र्यांचा सल्ला रावणाने ऐकला नाही. त्याचे वाईट फळ मिळाले.
- शत्रुला कधीही कमी समजू नये - हनुमान आणि वानरसेनेला रावणाने माकड समजून कमी लेखले. पण, तिन्ही लोकावर राज्य करणारा रावण हा या वानरसेनेपुढे पराजित झाला.
- अधिकार असले तरी त्याचा वापर इतरांच्या भल्यासाठी करावा - राजा म्हणून असलेल्या अधिकाराचा उपयोग केल्याने रावणाची अपकीर्ती झाली. त्याच्याविरोधात झालेल्या असंतोषामुळे त्याचे राज्य व सत्ता धुळीस मिळाले.
- परस्त्रीबाबत अभिलाषा बाळगू नये - परस्त्रीबाबत अभिलाषा बाळगल्याने रावणाने सीताहरण केले. त्यानंतर राम-रावण युद्ध झाले.
- कुटुंबातील अथवा जवळच्या व्यक्तींचा सल्ला ऐका- रावणाची पत्नी मंदोदरीने सीतेला सोडून देण्याची अनेकवेळा विनंती केली होती. मात्र रावणाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचे वाईट फळ रावणाला भोगावे लागले.
- गर्व करू नका- अह्म ब्रह्मास्मी म्हणत गर्व करणाऱ्या रावणाचा शेवट झाला. केवळ गर्व केल्यामुळे रावणाला सत्य परिस्थितीचे आकलन होऊ शकले नाही.
हेही वाचा-लखीमपूर हिंसाचार घटनेचे रिक्रिएशन, पोलिसांनी मंत्रीपुत्रासह तिघांना नेले घटनास्थळी