नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतामध्ये होत असलेल्या कोरोना लस निर्मितीवर जगाचे लक्ष लागले आहे. आज बुधवारी जगभरातील 64 देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी हैदराबादच्या दौऱ्यावर आहेत. आज हे मंडळ भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड म्हणजे बीई कंपन्यांचा दौरा करणार आहेत.
जवळपास एक महिन्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने 190 पेक्षा जास्त प्रमुख अंतरराष्ट्रीय संघटनांना कोरोनासंदर्भातील बाबींची माहिती दिली होती. भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड दोन्ही कंपन्या कोरोनावर लस निर्माण करत आहेत. भारत बायोटेकने कोरोनावर 'कोव्हॅक्सिन' निर्माण केली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी जगाच्या प्रयत्नात भारत मोलाचे योगदान देत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर भर -
कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, आरोग्य आणि जीवन विज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. तथापि, भारतातील लस विकसनाच्या प्रगतीवर पंतप्रधान व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. अहमदाबादमधील झायडस, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादमधील भारत बायोटेक या तिन्ही ठिकाणांना पंतप्रधानांनी भेट दिली होती. तसेच स्वदेशी लस विकसनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 900 कोटी रूपयांचे मिशन कोविड सुरक्षा (कोविड सुरक्षा मोहिम) पॅकेज जाहीर केले आहे.
कोव्हिशिल्डची किंमत सर्वात कमी -
भारतात सध्या ऑक्सफर्ड, सिरमची कोव्हीशिल्ड, भारत बायोटेक तसेच कॅडीला आणि युकेची फायझर रशियाची स्फुटनिक या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. फायझरने युएसमध्ये देखील त्यांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. भारतातही त्यांनी निर्मितीची परवानगी मागितली असून आता इतर लस निर्मिती कंपन्यांनी बाजारात उतरण्याची तयारी चालवली आहे. त्यानंतर आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील परवानगी मागितली आहे. दरम्यान, इतर लसीच्या तुलनेत कोव्हिशिल्डची किंमत सर्वात कमी आणि सर्वसामान्यांना परवडणारी असेल, असा दावा ही कंपनीने यापूर्वी केला आहे.
हेही वाचा - कोरोना लसीचा पहिला डोस इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या हरी शुक्लांना मिळणार