बिकानेर - आज पुन्हा राजस्थानच्या बिकानेरमध्ये भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी हा भूंकप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 नोंदविली गेली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाले नाही.
कालसुद्धा बिकानेरच्या काही परिसरात 5.3 रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते.
भूंकप झाल्यास काय करावे -
- इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
- भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
- मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.
- घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.
- उंचावरून घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा.