चेन्नई - कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. गर्भवती असलेल्या 29 वर्षीय डॉक्टर कार्तीगा यांचे कोरोनामुळे निधन झाले. तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील पोलूर भागातील त्या रहिवासी होत्या.
कार्तीगा 8 महिन्यांच्या गर्भवती होत्या. या निमित्ताने त्यांच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रमच सुपर स्प्रेडर ठरला. श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यानंतर कार्तिगा यांना उपचारासाठी चेन्नई येथे हलवण्यात आले होते. कार्तिगा काही दिवस ऑक्सिजन सपोर्टवर होत्या. मात्र, दिवसागणिक त्यांची तब्येत ढासळत चालली. मात्र, अखेर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
गर्भवती महिलेची आत्महत्या -
पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गर्भवती असलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली होती. ही घटना कर्नाटकाच्या बसवेश्वर नगरमध्ये घडली. कोरोनाच्या या संकटात अनेकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर संबंधित रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळत आहे.
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2 लाख, 22 हजार, 315 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, एका दिवसातील मृत्यूंची संख्या आज पुन्हा चार हजारांच्या वर नोंदवली गेली आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या तीन लाखांवर गेली आहे. सध्या देशात २७ लाख, २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये ९ लाख, ४२ हजार ७२२ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. यानंतर एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १९ कोटी, ६० लाख, ५१ हजार ९६२ वर पोहोचली आहे.