नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल तीनवरुन कस्टम अधिकाऱ्यांनी दोन अफगाणी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल १३६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हे दोघे दुबईहून भारतात आले होते.
१९.५ किलो अमली पदार्थ जप्त..
कस्टमचे सहआयुक्त शौकत अली नर्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नागरिकांकडून सुमारे १९.५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची एकूण किंमत १३६ कोटी, ३६ लाख एवढी आहे. हे दोघे दुबईमार्गे भारतात आले होते. त्यांचा एकूण प्रवासाचा मार्ग पाहता, कस्टम अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांना बाजूला घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांचे सामान तपासले असता, या दोघांच्याही बॅग्समधून अमली पदार्थ मिळाले.
या दोघांकडे मोठ्या प्रमाणात शॅम्पू आणि हेअर कलरचे डबे होते. याच्या आतमध्ये मॉडिफाईड ड्रग्ज आणि लिक्विड हेरॉईन आढळून आले. हे सर्व पदार्थ ताब्यात घेत, कस्टम विभागाने या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : उत्तराखंडमध्ये तब्बल सात हजार फूट उंचीवर आढळला 'कोब्रा'; पाहा व्हिडिओ..