नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर अशा साधनांचा तुडवडा अधिक जाणवू लागला आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. देशातील १०० रुग्णालयांना आता स्वतःचा ऑक्सिजन प्लांट मिळणार आहे. यासाठी पीएम-केअर्स फंडमधून निधी देण्यात येणार असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.
ऑक्सिजनची करणार आयात..
देशातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन आणि इतर आवश्यक साधनांच्या उपलब्धतेबाबत गुरुवारी इम्पॉवर्ड ग्रुप २ ची बैठक पार पडली. यावेळी देशातील कित्येक राज्यांकडे अगदी काही दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याचे समोर आले. त्यामुळे नवीन ऑक्सिजन प्लांट्सच्या उभारणीसोबतच, ५० हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये मोठा तुटवडा..
महाराष्ट्राकडे ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे, मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात उत्पादनापेक्षा मागणी वाढणार असल्याचे दिसत आहे. तसेच, मध्य प्रदेशला जेवढा ऑक्सिजन आवश्यक आहे तेवढा तयार करण्याची क्षमताच त्या राज्यात नाही. यासोबतच गुजरात, कर्नाटक, राजस्थानमध्येही ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे या बैठकीत समोर आले.
यासोबतच, देशातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यानंतर देशातील सर्व रेमडेसिवीर उत्पादकांना आपले उत्पादन वाढवण्याचे, आणि किंमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मनसुख मालवीय यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : हाफकिनला कोवॅक्सीनचे उत्पादन घेण्याकरता केंद्राची मान्यता; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार