मुंबई Mumbai University Senate Election : - मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 2022 रोजी सिनेटचा कार्यकाळ संपला होता. तेव्हापासून सिनेट निवडणूक दोनवेळा जाहीर करून वेगवेगळ्या कारणामुळं रद्द करण्यात होती. 22 सप्टेंबर 2024 रोजी होणारी निवडणूक रद्द झाल्यानंतर याविरोधात युवासेना कोर्टात गेली होती. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात यावी, असे निर्देश कोर्टानं दिले होते. 24 सप्टेंबर रोजी 10 जागांसाठी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे मतदान पार पडले होते. त्याचा निकाल आज (शुक्रवारी) लागला आहे. युवासेना आणि अभाविप असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला. पण या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या युवासेनेनं बाजी मारली आहे.
युवासेनेचे राखीव 5 उमेदवार विजयी : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंची युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत झाली होती. पण या निवडणुकीत युवासेनेनं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा राखलं आहे. युवासेनेचे पाच उमेदवार राखीव प्रवर्गातून विजयी झालेत. यामध्ये ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ हे 5 हजार 350 मतांनी विजयी झाले. एससी प्रवर्गातून शितल देवरुखकर यांचा विजय झाला. तर स्नेहा गवळी, शशिकांत झोरे हे एनटी प्रवर्गातून विजयी झाले. तसेच धनराज कोहचाडे हे एसटी प्रवर्गातून विजयी झालेत. त्यामुळे युवासेनेचे राखीव प्रवर्गातून पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. तर खुल्या गटातून युवासेनेचे प्रदीप सावंत, मिलिंद साटम आणि अल्पेश भोईर यांचादेखील विजय झाला आहे. त्यामुळे 10 पैकी 10 जागांवर युवासेनेनं बाजी मारली आहे.
10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात : सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेनं 10 जागांवर निवडणूक लढवली. तर भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनंसुद्धा 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर अन्य 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे सिनेट निवडणुकीच्या 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 10 पैकी 10 जागांवर युवासेना विजयी झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला खातंही उघडता आलेले नाही. युवासेनेच्या या विजयावर जल्लोष साजरा करण्यात येत असून, शिवसेना फुटीनंतर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचीच खरी युवासेना असल्याची प्रतिक्रिया युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेटवर युवासेनेचाच झेंडा, 10 पैकी 10 जागांवर ठाकरेंचाच विजय - Mumbai University Senate Election
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंची युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत झाली होती. पण या निवडणुकीत युवासेनेनं 10 पैकी 10 म्हणजे सर्वच जागा जिंकून आपलं वर्चस्व पुन्हा एकदा राखलं आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक (संग्रहित छायाचित्र)
Published : Sep 27, 2024, 8:26 PM IST
|Updated : Sep 30, 2024, 12:47 PM IST
Last Updated : Sep 30, 2024, 12:47 PM IST