सातारा - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला आज प्रारंभ होत आहे. माजी सहकार मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. गेल्या १९ वर्षापासून हे प्रदर्शन अखंडपणे सुरू आहे.
कराडमध्ये भरलंय 'यशवंत कृषी प्रदर्शन', आधुनिक तंत्रज्ञानाची मेजवानी, कधीपर्यंत आहे सुरू? - YASHWANT AGRICULTURAL EXHIBITION
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविल्या जाणाऱ्या यशवंत कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाला आजपासून (६ डिसेंबर) सुरूवात झाली. १० डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे.
Published : Dec 6, 2024, 5:35 PM IST
कराडमध्ये आजपासून कृषी जागर :बाजार समितीच्या स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला (बैल बाजार) आवारात प्रदर्शन होत असून या प्रदर्शनात चारशेहून अधिक स्टॉल सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढील चार दिवस या प्रदर्शनात अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहता येणार आहे. कराड बाजार समिती, शासनाचा कृषी विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कृषी विभाग आणि महिला बचत गटांसाठी स्टॉल राखीव आहेत.
आचारसंहितेमुळं प्रदर्शन लांबणीवर :दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन व्हायचं. मात्र, यंदा विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेमुळं प्रदर्शन पुढे ढकलावं लागलं. शुक्रवारी (७ डिसेंबर) खासदार तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते आणि कराड उत्तररचे आमदार मनोज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होईल. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची उपस्थिती असेल.