मुंबई Vidhan Parishad election -विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करून घोडेबाजार थांबवावा अशी सर्वच पक्षाची इच्छा होती. परंतु आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने आता १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात असून घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
विजयासाठी आमदारांना २३ (२२.८४ ) मत्तांचा कोटा - विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होणार असून यासाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील एक उमेदवारी अर्ज मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार सुद्धा घेतला होता. परंतु याचा ताळमेल न बसल्याने अखेर निवडणूक होत आहे. विधानसभेतील एकूण २८८ जागांपैकी १४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकूण २७४ आमदार मतदान करणार असून, विजयासाठी आमदारांना २३ (२२.८४ ) मतांचा कोटा असणार आहे.आता निवडणूक जाहीर झाल्याने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांना आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
घोडेबाजाराची सुरुवात कोणी केली -निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार होणार आहे, असं दिसतय. याविषयी बोलताना काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून या राज्याच्या राजकारणात घोडेबाजाराला सुरुवात झाली आहे. पूर्वी अशा पद्धतीच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसत असत. यातून मार्ग काढून निवडणूक बिनविरोध करत असत. परंतु आता सत्ताधारी हे विरोधकांना दुश्मनच समजत आहेत आणि त्या पद्धतीनेच वागत असल्याने अशा प्रकारच्या निवडणुकीत घोडेबाजार होत आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीविषयी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही महायुतीचे ९ च्या ९ आमदार निवडून आणू यात काही शंका नाही. घोडेमैदान काही जास्त लांब नाही. महाविकास आघाडीचे संख्याबळ नसताना त्यांनी उमेदवार दिले आहेत. विजय आमचाच आहे, असेही शंभूराज म्हणाले.