बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. या अनुषंगानं आवादा कंपनीच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप करण्यात आले आहेत. मात्र वाल्मिक कराडवर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत त्यांच्या आईनं परळी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. "दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या," अशी मागणी वाल्मिक कराडच्या 75 वर्षीय आई पारुबाई बाबुराव कराड (Parubai Baburao Karad) यांनी केली आहे.
वाल्मिक कराडच्या आईची तब्येत अचानक बिघडली :बीडमध्ये वाल्मिक कराडला न्याय मिळावा म्हणून समर्थक आक्रमक झाले. तर आईही रस्त्यावर उतरली. त्यातच वाल्मिक कराडच्या आईची तब्येत अचानक बिघडली. कराडची आई पारुबाई यांची प्रकृती बिघडल्यानं त्या रस्त्यात चक्कर येऊन पडल्या. त्यामुळं परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.