पुणे : Vijay Shivtare on backfoot: राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो. आम्ही जनतेसाठी लढतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी दिली आहे. (Shivtare Pawar debate) बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष लढणार असा ठाम निर्णय घेणारे विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर माघार घेतल्याचं चित्र आहे. मात्र, विजय शिवतारे सासवड येथे सर्व समर्थकांची बैठक घेणार असून, त्यानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी आज पुण्यात घेतली आहे.
प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विजय शिवतारे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अडीच तास बैठक झाली. मतदार संघातील लोकांच्या भावना या मी तिघांना कळवल्या आहेत. उद्या मी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये काय झालं त्याची सगळी माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे असंही ते म्हणाले आहेत.
कार्यकर्त्यांची बैठक घेणार : पवार विरोधी पाच लाख मतदार आहेत असं तुम्ही म्हणाला आणि पवारांचा काय हा सातबारा नाही असंही म्हणाला होतात. त्यावर तुमची भूमिका काय? असं विचारलं असता विजय शिवतारे म्हणाले, राजकारणात आम्ही स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी लढत असतो. उद्या बैठक करून परत मुंबईला जाईन. राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असंही ते म्हणाले. तसंच, प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचं मत काय आहे हे जाणून घेणार आहे. कार्यकर्त्यांचं मत नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल ते पाहून पुढील निर्णय घेणार असंही ते म्हणाले.
हात जोडले : जनतेचा आवाज ऐकून मी बारामती लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला होता. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसंच, सूर नरमाईचा दिसतो असं विचारताच, "आता जास्त बोललं की तुम्ही परत तेच शब्द दाखवणार" असं शिवतारे म्हणाले. तसंच, बैठकीत अजित पवारांनी काय सांगितलं यावर बोलताना शिवतारेंनी हात जोडले.