मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय.सर्व भगव्या टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलंय. भगवा रंग आहेच. भगव्याला कलंक लावणारा जन्माला आलेला नाही आणि येऊच शकत नाही. आज मला अभिमान आहे की, आपण हातात तिरंगा घेऊन आणि भगवी टोपी घालून इथे उभे आहोत. ज्या ज्या वेळेला तिरंग्यावरती संकट आले होते त्या वेळेला आपला महाराष्ट्र म्हणजे भगव्याचा भक्त धावून गेलाय. दोन-तीन वर्षांपूर्वी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालीत आणि काही जणांच्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झालं असं वाटतंय, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावलाय. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेचं पूजन अन् संविधान दिंडी मुंबईतील दादर येथे काढण्यात आली होती, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
त्यांना संविधान बदलायचे होते :काही लोकांना स्वातंत्र्याची किंमत नाही, घरादारावर निखारा ठेवून स्वातंत्र्य मिळवलं त्याची किंमत नाही. आज ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले, ना संयुक्त मराठीसाठी उतरले, असंही भाजपाचं नाव न घेता ठाकरेंनी टीका केलीय. संविधान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, काहींना संविधान फॅशन वाटते, तुम्हाला दाखवतो फॅशन काय असते. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांची जागा त्यांना दाखवून दिलीच पाहिजे. 25 जानेवारी हा मतदार दिन होता. कसं मतदान झालंय हे सगळ्यांनीच पाहिलंय. ईव्हीएममध्ये घोटाळा होतोय, सत्ताधारी सर्व यंत्रणा हातात घेऊन घोटाळे केले जाताहेत. लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा भाजपाला 400 पार जागा पाहिजेत, असं म्हणत होते. म्हणजे त्यांना संविधान बदलायचं आहे, असा त्यांचा डाव होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधलाय.
याला लोकशाही म्हणायची का? :शिवसेना फुटूनसुद्धा अडीच वर्षे झाली. संविधानात कलम 10 आहे, पण त्याला कलम म्हणायचं नाही. याला हुकूमशाही म्हणतात. तो निकाल दोन-तीन महिन्यांत लागायला हवा होता. तो अद्यापपर्यंत लागलेला नाही. आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवर मतदान केलंय. मी स्वतः केलंय. एका कागदावर उमेदवाराचं नाव आणि त्यावर शिक्का मारायचा, त्यामुळे आपलं मत कुठे जातं हे आपल्याला कळत होतं. मी या देशाचा नागरिक आहे, मला मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे माझं मत कुठे जात आहे हे मला कळलं पाहिजे. पण आता आपण बटन दाबतोय आणि दिवा पेटतो आणि आवाज येतोय. त्यामुळे व्हीव्हीपॅटचीसुद्धा रिसीट दिसते. ती खाली जातसुद्धा असेल पण माझं मत आज नोंदणीकृत कुठे आणि कसं झालं हे मला कळण्याचा अधिकार होता. पण तो सरकारने काढून घेतलाय. पण ती पावती केराच्या टोपलीत जात असेल, याची मतमोजणी होत नसेल, तर याचा काय उपयोग? त्याहून भयानक आहे की, मतदार केंद्रातला व्हिडीओ शूटिंग तुम्ही मागितला तर तुम्हाला मिळणार नाही, याला लोकशाही म्हणायचं का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.
भारत मातेला स्वकियांपासून मुक्त केलं पाहिजे :बाळासाहेबांचे विचार आहेत की, एका हातात तिरंगा आणि एक हातात भगवा असावा. संविधानासाठी दुसरे कोणीच नसतं तरी शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे. प्रत्येक तालुक्याचे जिल्ह्यातही भारत मातेचं प्रतिमापूजन झालंच पाहिजे. स्वातंत्र्यलढ्यात परकीयांपासून भारत मातेला मुक्त केलं पाहिजे. तसेच आता स्वकीयांपासूनसुद्धा भारत मातेला पुन्हा एकदा साखळ दंडात बांधून ठेवणार असतील तर ते आपण तोडले पाहिजेत. आज आपल्या या कार्यक्रमातूनच जे कोणी आपल्याला पाहत असतील, त्यांना आपण इशारा देत आहोत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केलीय.
संविधानाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात - UDDHAV THACKERAY ON SAVIDHAN
लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा भाजपाला 400 पार जागा पाहिजे होत्या. म्हणजे त्यांचा संविधान बदलायचा डाव होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधलाय.
उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात (Source- ETV Bharat)
Published : Jan 26, 2025, 12:36 PM IST