ठाणे Girl Abused In Thane :ठाणे महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करण्यात आला. मात्र रुग्णाच्या नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. रुग्णाचे नातेवाईक आणि संपकरी डॉक्टरांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नराधमाला जबर चोपलं. त्यानंतर या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. प्रदीप शेळके (42) असं त्या दिव्यांग बालिकेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी प्रदीप शेळके याला अटक केली आहे. रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे.
आईबरोबर रुग्णालयात आली होती दिव्यांग बालिका :आईबरोबर सोमवारी कळवा रुग्णालयात आलेली 11 वर्षीय पीडित बालिका रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्याचवेळी नराधम प्रदीप यानं त्या बालिकेला त्याठिकाणच्या उद्यानात नेलं. तिथं तो तिच्याशी अश्लिल चाळे करु लागला. मात्र ही बाब एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या निदर्शनास आली. दरम्यान, रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्या नातेवाईकानं या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डाक्टरांना दिली. डॉक्टरांनी तत्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून नराधम प्रदीप याला चोप देत ताब्यात घेतलं. या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी प्रदीप याला अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.