मुंबईMLA Ravindra Waikar :रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात; पण आता ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 'ईडी' सारख्या तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडून आणि त्यांना कंटाळून ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं बोललं जातंय. मागील काही दिवसांपासून वायकरांच्या मागे ईडी लागली आहे. जागेश्वरीतील जागेवरून ‘ईडी’चा चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याबाबत त्यांची सखोल चौकशी ईडीने केली होती. जोगेश्वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तसेच रवींद्र वायकर हे मुंबई महानगरपालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहिलेले आहेत. रायगड जिल्ह्यात वायकर कुटुंबीयांनी बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांना बोलावले :रवींद्र वायकरांचा आजचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता वायकरांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. दरम्यान, वायकरांनी जवळच्या कार्यकर्त्यांना 5 वाजता जोगेश्वरीतील मातोश्री येथे येण्यास सांगितले आहे. येथे चर्चा केल्यानंतर रवींद्र वायकर यांच्यासह कार्यकर्ते थेट वर्षा बंगल्यावर पोहचणार आहेत. येथे संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.