मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी साळवी कुटुंबीयांविरुद्ध 21 फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करणार नाही, अशी तोंडी हमी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) न्यायालयात दिली आहे. एसीबीच्या या भूमिकेने एकप्रकारे साळवी यांना दिलासा मिळाला आहे.
21 तारखेला पुन्हा सुनावणी : आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलगा शुभम यांचा रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात या अर्जाबाबत सोमवारी म्हणणं ऐकून घेतलं होतं. यावेळी दोन्हीकडील युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने काल यावर सुनावणी ठेवली होती. दरम्यान, येत्या 21 तारखेला पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे गुन्हा : भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 (संशोधन 2018) चे कलम 13(1)(ब) सह 13(2) प्रमाणे राजन साळवी यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम यांची नमूद मालमत्ता ही बेहिशेबी बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 18 जानेवारी रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता.
साळवींचे कार्यकर्ते संतप्त : या कारवाईनंतर राजन साळवी आक्रमक झाले होते. आपण ठाकरे गटात निष्ठावंत असल्याने आपल्याला त्रास देण्यासाठीच अँटी करप्शन विभागाकडून ही चौकशी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर जिल्ह्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले होते. हायकोर्टाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.