पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "मला एक गोष्ट आश्चर्याची वाटते की, जे अटक होत आहेत ते पुण्यातूनच का होत आहेत? आणि हे चॅनेलवर दाखवण्यात आलं आहे. यामुळं याबाबत पोलिसांनी व्हेरिफिकेशन द्यायला हवं की नक्की काय चाललं आहे. ही फक्त राज्याची बातमी नाहीतर याची चर्चा आता दिल्लीतही होत आहे. दिल्लीतील अनेक खासदार तसंच विचारवंतांचे फोन येत आहेत. नक्की महाराष्ट्रात काय चाललंय? याबाबत देशात अस्वस्थता आहे. यामुळं राज्य सरकारनं याबाबत पारदर्शक माहिती दिली पाहिजे". खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्र्यांबाबत पहिल्यांदाच अशी चर्चा :पालकमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडून आल्यानंतर सरकार बसलं आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. पण पालक मंत्र्यांबाबत पहिल्यांदाच मी अशी चर्चाऐकली आहे. अनेकवेळा सत्ता येते पण पालकमंत्री पदाबाबत अशी चर्चा ही राज्याच्या हिताची नाही. सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तरीही सगळ्याच गोष्टी उशिरा होत आहेत. अनेक मंत्र्यांनी चार्ज घेतलेला नाही.