मुंबई Free Wi Fi In Mumbai:मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये कोट्यवधी पर्यटक आणि व्यापारासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना मुंबईत येताच मुंबईत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. राज्य सरकारने सुरू केलेला हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेला आहे. हा उपक्रम पुन्हा एकदा कार्यान्वित करून परदेशी नागरिकांना किमान सोय उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी दिली.
प्रायोगिक तत्त्वानंतर योजना बंद :मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच सोबत अत्यंत महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेलं शहर आहे. मुंबईमध्ये मोफत वायफाय संकल्पना मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 2017 मध्ये राबविण्यात आली होती; मात्र मोफत वायफाय 500 ठिकाणी सुरू करण्याच्या प्रायोगिक तत्त्वानंतर ही योजना बंद झाली. मुंबई महानगरपालिकेच्या गत निवडणुकीपूर्वी मुंबई सुमारे 1200 ठिकाणी मोफत वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्यात येणार होते; मात्र कालांतराने ही योजना बंद पडली. आता सध्या मुंबईत ही योजना पूर्ण बंद अवस्थेत असल्याची माहिती पराग जैन यांनी दिली आहे.
एल अँड टी यांना कंत्राट :मुंबई परिसरातील सर्व मोफत वायफाय योजना ही एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएमआरडीएने एल अँड टी या कंपनीला कंत्राटही दिले होते; मात्र त्यानंतर एमएमआरडीएने हे कंत्राट रद्द करीत मुंबईत मोफत वायफाय सुरू करण्यात बाबत माघार घेतली. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई परिसरात मोफत वायफाय ही संकल्पना सुरू नाही. वास्तविक मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. परदेशातून विविध कारणांनी पर्यटक म्हणून किंवा उद्योग व्यापारासाठी मुंबईत येणाऱ्या परदेशी नागरिकांची दर वर्षाची संख्या ही दीड कोटीच्या आसपास आहे. परदेशातून आल्यानंतर विमानतळाबाहेर पडतात टॅक्सी बुक करायची असेल अथवा अन्य काही ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर त्यासाठी वायफायची गरज असते.