बुलढाणा-जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील आलेल्या केस गळतीच्या आजारानं अनेकांना अक्षरशः हैराण केलंय. ज्या गावात केस गळतीच्या आजारांचे रुग्ण सापडलेत. त्या बोंडगावात कोणी लग्नासाठी मुलगीही द्यायला तयार नाही. टक्कल व्हायरसच्या भीतीने सोयरीक जुळत नसल्याने लग्नाच्या वयात आलेल्या मुलांना कोणी मुली देत नाहीयेत. केस गळतीच्या आजाराचे निदान करण्यात अद्याप आरोग्य यंत्रणेला यश आले नाही. त्यामुळे टक्कल व्हायरसच्या शोध लवकरात लवकर लावून गावकऱ्यांना या संकटातून मुक्त करावं, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
15 गावांमध्ये टक्कल व्हायरसची भीती :जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यात जवळपास 15 गावांमध्ये टक्कल व्हायरसची भीती अद्याप कायम आहे. या व्हायरस रोगाची थेट केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेत आयसीएमआरची चमू थेट दिल्ली चेन्नई आणि भोपाळ येथून बुलढाणा जिल्ह्यातील या बाधित गावांमध्ये पोहोचलीय. या केस गळतीबाबत केंद्रीय पथकाने संवाद साधला असून, आता संशोधन अहवालाची प्रतीक्षा आहे. गेल्या 15 दिवसांपासून शेगाव तालुक्यातील केस गळतीमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले असताना या प्रकाराने राज्यभरातसुद्धा चिंता निर्माण झालीय. नेमकी कशामुळे टक्कल पडत आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जाताहेत. शेगाव तालुक्यात गाव पातळीवरील अधिकाऱ्यांचं राज्य जिल्हा आणि आता देशपातळीवर संशोधक आलेत. त्यांच्या संशोधन अहवालानंतरच नेमकी कारणं पुढे येणार आहेत.
टक्कल पडत असलेल्या महिलेचा धक्कादायक व्हिडीओ :शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण 15 दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर आजपर्यंत शेगावसह नांदुरा तालुक्यात 178 पेक्षा जास्त रुग्णांना टक्कल पडत असल्याचे आढळलंय. मात्र, हे टक्कल कशामुळे पडत आहे, एवढी केसगळती कशामुळे होत आहे, याचा आरोग्य विभागाला अद्याप तरी शोध लागलेला नाही. याच दरम्यान एका महिलेच्या केसगळतीचा व्हिडीओ समोर आला असून, तिचे केस अगदी सहज हातात येत आहेत. बोंडगाव येथे आलेल्या एका 25 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील केस सहजपणे हातात येत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या महिलेच्या डोक्यावरील केस हे सहजपणे हातात येत असून पूर्णपणे टक्कल पडलंय, यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालीय.