मुंबई Graduate Constituency Election : लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन महायुतीत शेवटपर्यंत एकमत होत नव्हतं. त्यामुळं हाच प्रकार पुन्हा विधानपरिषद निवडणुकीत देखील दिसत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेनेसह भाजपानं अर्ज दाखल केले होते. मात्र, आज शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं आता कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचे (भाजपा) उमेदवार निरंजन डावखरे आहेत.
पक्षांकडून 3 अर्ज दाखल :विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेकडून संजय मोरे तर भाजपाकडून निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळं महायुतीत समन्वय नसल्याचं दिसून आलं. महायुतीतूनच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळं चांगलीच चर्चा रंगली होती. पण आज अखेरच्या दिवशी संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. तर काही दिवसांपूर्वी मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळं आता या मतदासंघात फक्त निरंजन डावखरे उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे.