मुंबई- विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झालीय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर दाऊदला भेटल्याचा आरोप केला असून, पवारांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1989 ते 1991 या कालावधीत दाऊदची भेट घेतली होती, असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
काय आहेत आरोप? : शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1989 ते 1991 या कालावधीत मुंबई ते इंग्लंड आणि तिथून कॅलिफोर्निया, तसेच कॅलिफोर्नियातून पुन्हा इंग्लंडला येऊन ते दुबईत गेले होते. मुख्यमंत्री असल्याने त्यांना आपल्या दौऱ्याची कल्पना केंद्र सरकारला देणे अपेक्षित होते. त्यांनी तशी कल्पना केंद्र सरकारला दिली होती का? केंद्र सरकारने त्याबाबतचा काही अहवाल सादर केलाय का? या दौऱ्याचा तपशील उपलब्ध आहे का आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिम याची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख आहे का? दाऊद इब्राहिमच्या या भेटीबाबत काय तपशील आहे? हा तपशील शरद पवार यांनी स्पष्ट केला आहे का? असे प्रश्न ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेत.