पुणे MPSC Students Protest Pune : 'एमपीएससी' विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिलाय. विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत. रोहित पवार हे देखील या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत. काल रात्रभर रोहित पवार हे आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत होते.
रोहित पवार MPSC विद्यार्थी आंदोलनात सहभागी (Source ; ETV Bharat Reporter) रोहित पवार रात्रभर आंदोलनस्थळी मुलांसोबत :कृषीसेवा पदांचा समावेश जाहिरातीत करावा तसंच आयबीपीसी आणि एमपीएससीचे पेपर एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर 'एमपीएससी' विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत पाठिंबा दिला आणि रात्रभर ते मुलांसोबतच आंदोलनाला बसले.
शरद पवारांचा इशारा : यावेळी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. विद्यार्थ्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा हे उपोषण असंच सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या आंदोलनाला शरद पवार यांनीही पाठिंबा दिलाय. तोडगा निघाला नाहीतर मीसुद्धा आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला. त्यामुळं हे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांचा इशारा : "हा विषय खूप पूर्वीचा असून, विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीनं मुख्यमंत्री तसेच विविध नेतेमंडळींना भेटून त्यांचं म्हणणं मांडलं आहे. आता परीक्षेचा पॅटर्न हा बदलणार आहे. राज्य सेवेची जी परीक्षा आहे, त्यात कृषी सेवेचा देखील समावेश व्हावा ही पूर्वीची मागणी. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सांगण्यात देखील आलं होतं. मुख्यमंत्री कार्यालयातून तसं पत्र आयोगाला पाठवण्यात आलं होतं. मात्र, आयोगानं कुठेही गांभीर्य दाखवलं नाही. हा लढा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा असून आम्ही यात राजकारण आणत नाहीत," असं म्हणत रोहित पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. जो पर्यंत सरकार तसेच आयोग सकारात्मक निर्णय घेत नाही, तो पर्यंत मी देखील उपोषण असंच सुरू ठेवणार असल्याचा इशारा रोहित पवारांनी दिला.
हेही वाचा -महाराष्ट्रात जनतेला राजकीय परिवर्तन हवंय - शरद पवार - Sharad Pawar on assembly elections