बारामतीNamo Employment Fair :येत्या 2 मार्च रोजी बारामतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, हा मेळावा वेगळ्या कारणामुळं चर्चेत आला आहे. बारामतीचे सर्वेसर्वा असलेले खासदार शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. त्यामुळं शरद पवार या कार्यक्रमाला येणार का?, अशी चर्चा सुरू होती. त्यावर शरद पवारांनी गुगली टाकत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या बारामती येथील घरी जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळं पुन्हा राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणं आपली संस्कृती :"निमंत्रण पत्रिकेवर सुप्रिया सुळे यांचे नाव असलं, तरी आपल्याला निमंत्रण दिलं नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विद्या प्रतिष्ठान संस्था शरद पवार यांनी स्थापन केलेली आहे. त्यामुळं मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं, तर तिथं उपस्थित राहणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. "बारामतीत कुणीही आलं, की त्यांना घरी बोलावण्याचा आग्रह शरद पवार करतात. हीच आपली संस्कृती असल्याचंही खासदार सुळे यांनी यावेळी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री बारामतीत येत असतील, तर त्यांना निमंत्रित करणं ही आपली संस्कृती आहे," खासदार सुळे यांनी म्हटलं.